अंमळनेर -साने गुरुजींच्या कार्यक्षेत्रात संपन्न झाले ९७ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे मराठी साहित्य संमेलन 2 ते ४ फेब्रुवारी या कालावधीत अमळनेर , जळगाव येथे संपन्न झाले . अमळनेर येथे १९५२ नंतर दुसऱ्यांदा तीन दिवसीय हा कार्यक्रम होत आहे. यात विविध कार्यक्रम झाले त्यात अनेक नामवंत मराठी साहित्यिकांचा सहभाग पाहायला मिळाला . माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह भाषा आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थिती झाले .
ज्या
प्रताप महाविद्यालयाच्या वसती गृहात साने गुरुजी रहायला होते तिथेच संमेलनात
आलेल्या व सहभागी असणाऱ्या अतिथि ना राहायची सोय केली होती. महाविद्यालयाच्या
प्रांगणात प्रवेस केल्यावरच मला साने गुरुजींच्या आठवणीने मनात गलबलून गेले होते.
संमेलन व्यवस्थापनाने आम्हाला वसती
गृहाच्या ज्या २७ नंबर खोलीत रहायला संधी दिली तेव्हा तिथे काही लोक आमच्या शेजारी
असणारी ३० क्रमांकाची खोली पहायला येत होते आम्ही कुतुहलाने विचारले हीच खोली
पाहायला आपण का आलात तेव्हा त्या सर्वानी सांगितले की या ३० क्रमांकाच्या खोलीत
स्वतः साने गुरुजी त्यांच्या या महाविद्यालयातील सेवेच्या काळात राहत होते आणि
विशेष म्हणजे याच प्रांगणात बसून ते वसती गृहातील इतर विद्यार्थ्याना आपल्या अनेक
कथा ऐकवायचे. आमचे सुदैव असे की ही साने गुरुजींचे वास्तव्य असणारी खोली सुद्धा
संमेलन निवासासाठी उपलब्ध करून दिलेली होती. त्या खोलीत अजून कोणीही संमेलन अतिथि
आलेले नव्हते. मग मी व माझ्या साहित्यिक मित्राने ती साने गुरुजींची खोली निवासा
साठी निवडली कारण त्यामुळे आमच्या साने गुरुजींच्या स्मृतींना उजाळा मिळून त्याना
त्यातून विनम्र अभिवादन करता येईल अशी कल्पना मनात आली. आपल्याला त्यांचा सहवास
मिळाला नाही पण कमीत कमी त्यांनी मागे ठेवेलेल्या वास्तूंच्या सहवासाने आपल्याला
त्यांच्या सहवासाचा आनंद नक्कीच मिळेल अशी भावना मनात आली आणि आम्ही घाईने ही खोली
घेतली.
या
साने गुरुजींच्या पूर्व वास्तव्य असणाऱ्या खोलीत प्रवेश करतानाच आमचे हात या
खोलीच्या उंबऱ्याकडे नमस्कारासाठी आपोआपच वळाले अंगावर शहारा आला रोमांच उभे
राहीले त्यांच्या खोलीत राहण्या इतपत आमची पात्रता नक्कीच नव्हती पण ती दररोज
सराईत पणे या महाविद्यालयात वापरली जात होती याचे नवलच वाटले कारण अशा वास्तूचे
जतन विशेष बाब म्हणून व्हायला हवे होते. असो आपल्याला इथे रहायला मिळाले याचाच
आनंद आम्हाला होता. जुन्या प्रकारचे लाकडी दरवाजे व खिडक्या पूर्वीच्या काळाची
साक्ष देणाऱ्या होत्या खिडक्यांची तावदाने केव्हाच फुटून गेलेली होती. खिडकीतून
समोरचा लोहमार्ग व महाविद्यालयाच्या इतर इमारती स्पष्ट दिसत होत्या. पुढे अनेक
खोल्यांना जोडणारा भलं मोठा व्हरांडा होता त्यामुळे खूप मोठे लांब लचक आवार
खोलीच्या पुढे दिसत होते. पूर्वीच्या काळातील असायचे तसे जून प्लास्टर केलेल्या
भिंती त्याला केलेल्या लोखंडी जुन्या खुंटया दिसत होत्या. भिंतीमध्येच मोठ्या देवळीमध्ये
असलेले लाकडाचे कपडे ठेवण्याचे कपाटही होते. लाकडाची कॉट व त्यावर गादी व अंथरूण
अशा पद्धतीची खोलीची सर्व साधारण रचना होती.
सायंकाळी
अंमळनेर साहित्य संमेलन व्यवस्थापनाने दिलेल्या भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही जेव्हा
विसाव्यासाठी या खोलीत आलो तेव्हा समजले की या खोलीत खिडक्यांना तावदाने नसल्याने
सर्व मोकळ्या जागांमधून मच्छरांचा भला मोठा सूळसुळाट होत होता आता या त्यांच्या
गजला व कविता ऐकत आम्हाला रात्र कशीबशी काढावी लागणार होती. त्यामुळे निम्मी रात्र
आम्ही जागेच होतो जरा कुठे झोप लागायला लागली की मच्छर आम्हाला त्यांच्या न
आवडत्या गोष्टी सांगत होते. पण जागे राहिल्यामुळे साने गुरुजीच्या आमच्या आठवणीही
तेवढ्याच प्रखरतेने जाग्या झाल्या. साने गुरुजी त्यांच्या काळात कशा पद्धतीने इतर
मुलांना कथा सांगत असतील त्यांचे वास्तव्य कशा प्रकारचे असेल ही भावना मनात चमकून
गेली त्यांच्या स्मृति डोळ्यासमोर तरळायला लागल्या आणि मी मनात आत्तापर्यंत त्रास
देणाऱ्या मच्छरांचे आभार मानले. डोळ्यासमोर सतत साने गुरुजींची प्रतिमा येत होती.
डोळे छताकडे पाहत होते मात्र डोळ्यासमोर साने गुरुजींचे चरित्र दिसत होते. खरंच
नकळत आपल्या आयुष्यातील काही क्षण सोनेरी झाले याचा आनंद मनामध्ये होत होता आणि
त्यापुढे हे अखिल भारतीय साहित्य संमेलनही फिक्केच वाटत होते.
सकाळी उठल्यावर वसतिगृहाच्या प्रांगणामध्ये आम्ही वसतिगृहाची मुलं करतात त्या पद्धतीने थंड पाण्याने मोकळ्या
आवारात आंघोळ केली. कडेला छान झाडे होती पूर्वीच्या काळातील विहीर या झाडीमध्ये
दिसत होती. दुपारी माझ्या स्त्री शिक्षण या कवितेचे सादरीकरण झाले संमेलनाचे
अध्यक्ष मा रवींद्र शोभणे व कवीकट्टा अध्यक्ष मा राजन लाखे व्यासपीठावर होते
त्यांच्या हस्ते काव्य सन्मान मिळाला. पण या सन्मानपेक्षाही साने गुरुजींच्या
आठवणीने माझ्या आयुष्याला सन्मान दिला होता तो अविस्मरणीय होता. संमेलनातून वेळ
काढून आम्ही अंमळनेर शहरात प्रसिद्ध असणारे मंगल गृह मंदिर आणि पुरातन राम मंदिर
पाहिले व जाताना येताना अंमळनेर शहर दर्शन संपन्न झाले. आणि रात्री परतीच्या
प्रवासाला निघालो रस्त्यातून वेगात जाणारी आमची बस सर्वांगाने अनेक धक्के देत होती
पण प्रत्येक धक्यागणिक साने गुरुजींच्या श्यामची आठवण मात्र सुखावत होती. ९७ वे
अखिल भारतीय संमेलन सर्वांगाने यशस्वी झाले आणि प्रत्येक साहित्यिक रसिक अतिथि
वाचक प्रेक्षक यांच्या मनात साने गुरुजींच्या स्मृतीचे एक घर करून गेले.
- डॉ संजय
वसंत जगताप
सचिव , महाराष्ट्र
साहित्य परिषद
पिंपरी चिंचवड

0 टिप्पण्या