“होय , मी बस्तर बोलतोय ..!” – अनुवाद एक सुसंधी
डॉ राजाराम त्रिपाठी , अध्यक्ष भारतीय आयुर्वेद नवी दिल्ली , सदस्य स्वामिनाथन कमिटी भारत सरकार लिखित “अ बस्तर टेल्स” हिंदी मध्ये ‘मै बस्तर बोल रहा हूं |’ या पुस्तकाचा अनुवाद करण्याची सुसंधी मला प्राप्त झाली. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ राजाराम त्रिपाठी यांनी शेती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून छत्तीसगड येथील हजारो आदिवासींना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. भारताचे मा. राष्ट्रपति ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला आहे. डॉ. राजाराम त्रिपाठी यांचा बस्तर जिल्ह्यातील दरभा ककनार मध्ये जन्म व माध्यमिक पर्यंतचे शिक्षण गावामध्ये झाले. माध्यमिक शिक्षणापासून ते एम्.ए. (हिंदी) साहित्य, एम्.ए. अर्थशास्त्र, एम्.ए. इतिहास, एल्.एल्.बी., डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी इत्यादी पर्यंतचे शिक्षण रविशंकर वि. वि. जगदलपूरमधून पूर्ण केले. १९८१-८२ मध्ये बस्तर मधील 'साप्ताहिक बस्तर टाईम्स'मध्ये संपादक, शिक्षण, स.वि.वि. अधिकारी, बँक अधिकारी इत्यादी पदांवर काही वर्ष काम करून राजीनामा दिला. सध्या बस्तर भागातील वन-औषधींचा शोध आणि जैविक पद्धती मधून "वनऔषधांची शेती" सुरू आहे. देश विदेशातील वास्तविक मुद्यांवर १५ वर्षांपासून वर्तमानपत्र, ज्वलंत टेलिव्हीजन, इंटरनेटवर लेख व बातम्या प्रकाशित व प्रसारित केल्या आहेत. शेती व शेतकऱ्यांची अवस्था ? (दशा) आणि दिशा वर सतत राष्ट्रीय स्तरावर लेखन. पहिला काव्यसंग्रह "पत्र यात्रा"चे प्रकाशन सन २००० मध्ये झाले आहे.
डॉ.राजाराम त्रिपाठी यांचा "मी बस्तर बोलतोय...!" या काव्यसंग्रहाचा अनुवाद करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.हे भाषांतर करताना मनस्वी आनंद वाटला.हा कविता संग्रह म्हणजे आपली मायभुमी विषयी व्यक्त केलेले महन्मंगल स्तोत्रच आहे. छत्तीसगढ मधील 'धुर' या आदिवासी गावातील जन्मलेल्या बस्तरपुत्राची ही काव्य अभिव्यक्ती आहे. आपल्या मायभुमीविषयीची भावना किती उत्कट असावी याचे हे उत्तम उदाहरण आहे. बस्तरमधील वृक्षवल्ली ,पशुपक्षी यांचेविषयीचा त्यांचा गाढा अभ्यास आणि हुबेहूब साकारलेले वर्णन ऐकून समोर बस्तर उभा ठाकला असल्याचा आभास निर्माण होतो.
" आपल्या पेटत्या जखमांचे
काही विस्तव खोलत आहे,
होय, मी बस्तर बोलत आहे."
अशा त्यांच्या कवितेतील ओळी वाचल्या की बस्तर स्वतः आपले आत्मवृत्त सांगत असल्याची भावना मनात येते. नेते, अधिकारी, सावकार, पोलिस शिपाई यांच्या विळख्यातुन बस्तरची सुटका व्हावी यासाठी डॉ.त्रिपाठी यांनी आपल्या लेखणीतुन त्यांच्यावर कठोर प्रहार केला आहे.
" गावागावात उपासमारी, शहरात मात्र रोज दिवाळी
गाव बनत चालले स्मशान, कसा हा माझा देश महान ?
या ओळीतून त्यांनी सामाजिक व आर्थिक विषमतेची जाणिव करून दिली आहे. ते म्हणतात विरह, मिलन, चांदणी, फुलपाखरू, भुंगा, बगीचा याशिवाय कविता असेलच कशी....पण मी कसं समजाऊ माझी कविता या सर्वांशिवाय जगु शकते पण 'बस्तर' विना जगु शकत नाही कारण माझ्या कवितेत घायाळ जखमी बस्तर श्वास घेत आहे. माझ्या नसानसांत रक्ताशिवाय फक्त आणि फक्त 'बस्तर' धावत आहे. तरीही लोक मला म्हणतात बस्तर वरच का लिहितो. यातुन त्यांची मातृभुमी विषयीची अतुट भक्ती आणि निष्ठा दिसुन येते
" वजीरांच्या खेळात प्यादे मरणार कधीपर्यंत,
'मते' एकत्र थाळीत, नोटा जमत गेल्या दिल्लीत,
लुटारूंच्या या घटना, सहन करणार कधीपर्यंत...
जागेल तरूणाई अन् पकडेल मुसक्या ,
दंड थोपटून विचारेल उत्तर तुमचे हे चालणार कधीपर्यंत..?"
निद्रिस्त तरूणाईला जाग आणणारे आणि राजकीय व्यवस्थेवर आगपाखड करणारे लिखाण त्यांनी केले आहे. बस्तरसाठी मदत, सहानुभूती आणि भीक देऊन लाचार करणारे विचार त्यांना नको आहेत. या सर्वांशिवाय आम्ही जगू शकतो फक्त मला माझे बस्तर परत करा हे ते ठणकावून सांगतात.
मी कविता लिहीत नाही कविता जगण्याचा प्रयत्न करतोय. काळाच्या सरपट अश्वांना शब्दात वेसन घालण्याचा प्रयत्न करतोय. जळाने जळास बांधण्याचा, अन् आगीनेच आग विझविण्याचा प्रयत्न करतोय.अमावास्येच्या तिमिरांस प्रकाशाच्या शाईने चिरण्याचा प्रयत्न करतोय.....!
वा..वा..वा...खरंच एवढं साहित्यिक वजन त्रिपाठीजी आपल्या रचनेत आणि लिखाणांत आहे वाचून मन तृप्त होते.
" आई फक्त आईच असते" या कवितेतुन त्यांची ममता तर गौरेया या कवितेतून पशुपक्षी यांविषयी सहानुभूतीची तर 'बीज' या कवितेतून पर्यावरण प्रेम दिसून येते.'सत्य', 'मुखवटे' 'प्रतिबिंब' ,'कोण आहात तुम्ही लोक' या कवितांमधून माणसांचे सामाजिक मूल्यमापन आणि बेगडी प्रेम यांविषयीचे भाष्य दिसून येते.
डॉ.त्रिपाठी यांचे लेखन सर्वांगानी बहरलेलं असून आपल्या व्यक्तीमत्वाप्रमानेच परिपुर्णता असणारे आणि नवीन पिढीला आदर्श ठरावे असेच आहे. मी बस्तर बोलतोय....! हे सजीव विचारांच प्रतिक बनविण्यात तयांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या पुस्तकाचे भाषांतर करता करता मी बस्तरचा कधी झालो कळलेच नाही. सर्वांनी हे पुस्तक वाचावं आणि बस्तरला मनात साठवावं असंच आहे. या पुस्तकाची हिंदी, इंग्रजी आणि आता मराठी आवृत्ती प्रकाशित होत आहे.माणसाचं लिखान भाषा ,राज्य, प्रदेश यांपलिकडे जाऊन किती प्रभाव निर्माण करू शकतं हे त्रिपाठी यांनी दाखवून दिलं आहे.
छत्तिसगड मधील बस्तर बरोबरच महाराष्ट्रातील वाचकही आपल्या या लिखानाचं -हदयापासून स्वागत करतील यात शंकाच नाही .
त्यांचे हे विविधांगी लिखाण बस्तरप्रमाणेच बहरत जावो हिच सदिच्छा....!
बस्तर विषयी अधिक माहिती – ‘बस्तर' हा भारतातील छत्तीसगड राज्यामधील एक जिल्हा आहे. येथील लोकसंख्येचा ७०% भाग आदिवासी आहे. या प्रदेशाच्या उत्तरेला पर्वत, उत्तरपूर्व दिशेला रायपुर, पश्चिमेकडे चांदा, पूर्वेला कोरापुट, दक्षिणेला पूर्व गोदावरी जिल्हा आहे. माझ्या माहितीनुसार बस्तर हे पूर्वीचे स्थानिक राज्य होते. याचा अधिकतर भाग हा नापिक आहे. तिथे फक्त जंगल जास्त असून गोंड व इतर आदिवासी वास्तव्य करीत आहेत. येथील शेतीमध्ये ज्वारी व बाजरी हे प्रमुख पीक घेतले जाते. इंद्रावती ही प्रमुख नदी असुन जगदलपुर, कांकेर, कोंडागांव, भानुप्रतापपुर येथील प्रमुख शहरे आहेत. येथील आदिवासी जंगलात लाकूड, लाख, डिंक, मध, चमडे इ. पदार्थ जमा करून आपला उदरनिर्वाह करतात.
१४ व्या शतकात काही मोजक्या जागांवर इंग्रज आपले राज्य प्रस्तापित करू शकले नाहीत. त्यापैकी हा एक भाग. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा प्रदेश काही वर्षे मध्य प्रदेशचा हिस्सा बनले. आणि १ नोव्हेंबर २००० नंतर छत्तीसगड राज्याच्या निमिर्ती बरोबरच 'बस्तर' हा जिल्हा या राज्यातील एक भाग बनला. सस्यशामला भारतभुमीवर बस्तरची निर्मिती निसर्गाच्या सानिध्यात बसलेल्या भूप्रदेशात झाली. जो भाग हिरव्यागर्द बनांनी नटलेला आहे. जिथे विश्वविख्यात कुटूंबरसर ची गुहा आणि चित्रकुट जलप्रपात आहे. माँ दंतेश्वरीचे पावन धाम असून डंकनी आशि शंखनीच्या नद्यांनी माँ दंतेश्वरीच्या चरणावर स्वतःला वाहून घेऊन तिचे गौरव गीत गात त्या त्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करीत आहेत. जी धरती इथे लोखंड आणि अन्नधान्यासारखे सोने निर्माण करते आहे. जिथे नैसर्गिक फुलांचा सहवास, झरे आणि वाऱ्याच्या लोकसंगीताच्या तालावर नाचत्या बस्तर मधील आदिवासींचे हृदयाची धडपड चालू आहे. पण न जाणो कोणता काळ बस्तरच्या छातीत दारूगोळा भरत आहे. जो 'बस्तर' शांततेचे गीत गात होता तो आज लाल आतंकवादाचा बळी ठरला आहे. केव्हा कधी कुठे स्फोट होईल आणि माणसांवर काळाचा घाला होईल हे सांगू शकत नाही. जीवनाचे खरे संगीत लोप पावत चालले आहे.
बस्तरवासियांच्या ओठांवरील हसू कोणीतरी हेरावून घेतले आहे. काळजातील जखमांमध्ये निराशेचा सुर आणि अंधार गर्द होत चालला आहे. नयनांमध्ये आसवांचा पुर दाटून आला आहे. या सर्व परिस्थितीचा फायदा उठवून पुढारी आणि नेते मंडळी आश्वासने देऊन लोकांना लाचार बनवत आहेत व प्रलोभने देऊन मतांसाठी त्यांचा फायदा घेत आहेत. नवीन पिढी मात्र पाहूनही शांत व निद्रिस्त आहे.
आपली मातृभुमी असलेल्या या बस्तरला या सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा शांती प्राप्त करून देण्यासाठी डॉ. राजाराम त्रिपाठी यांची लेखनी पेटून उठली आहे . त्याचीच अभिव्यक्ती म्हणजे हा काव्यसंग्रह 'मी आदिवासी बोलतोय...' हा काव्यसंग्रह अतिशय प्रेरणादायी आहे. एक दर्जेदार काव्यसंग्रहाची निर्मिती काव्यमित्र प्रकाशनाच्या माध्यमातून झाली आहे.
डॉ. राजाराम त्रिपाठी यांच्या प्रतिभेने नटलेल्या मी आदिवासी बोलतोय या काव्यसंग्रहास व त्यांच्या भावी अष्टपैलू वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .. !
( प्रकाशित : पुस्तक - मी बस्तर बोलतोय, २०१६ , डॉ राजाराम त्रिपाठी,
मराठी अनुवाद – डॉ. संजय जगताप
सहसंपादक , राष्ट्रीय मासिक ककसाड


.jpeg)
0 टिप्पण्या