" स्मार्ट मावळ " सकाळ वृत्त पत्रात प्रकाशित लेख ( शब्दांकन - संजय जगताप )

" स्मार्ट मावळ "

“ माझ्या मावळच्या मातीचा गड्या गंधच आगळा..!" 
शूर वीरांच्या पुण्याईने सजे इतिहास सगळा ” 

"पराक्रमाची ही ओढ, जसा कातळ लोहगड, 
विसापूर असा बंधु जया नाही कुठे तोड" 

" गळा घालूनीया हात, इंद्रायणीची ही साथ. 
"पवनमाई भगिनी, करी दुष्काळावर मात" 

"कोळ्यावरी नजर, कार्ला एकविरा आई डोंगरावर, 
बुद्ध कीर्ती ही वर्णाया जग फिरते लेण्यावर" 

"मना-मनाला जोडिते, पुणे मुंबई ची लोकल 
महामार्गाचा हा सांकव, शोधी विकासाची उकल" 

"जगा पुरवाया गारवा, उभा लोणावळा खंडाळा,
माझ्या मावळच्या मातीचा गड्या गंधच आगळा."

              लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची अशा सह्यगिरीच्या कंठ्यात ओवलेल्या पाचूप्रमाने सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि इंद्रायणी व पवनामाई नद्यांच्या सुपीकतेने नटलेला मावळ तालुका इतिहास काळापासून दुर्गम डोंगराळ भागाचा, भौगोलिक पार्श्वभूमी आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपत आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अखंड स्वामी निष्ठेने साथ देणाऱ्या शूर मावळच्या भूमीत जगद्गुरु तुकोबाराय व माऊली ज्ञानेश्वर महाराज अशा अनेक संतांच्या संत साहित्याने या प्रांताला ज्ञानाचा प्रकाश दाखविला आहे. ही माती शूरवीरांच्या पराक्रमाने नटलेली, शेतकऱ्यांच्या घामाने भिजलेली आणि असंख्य मावळ्यांच्या स्वाभिमानाने सजलेली आहे. 

            पूर्वीच्या काळापासून आपल्या पूर्वजांकडून मिळालेला शिक्षणाचा वारसा या मातीने टिकवून ठेवलेला आहे.महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतील अस्सल मर्दानी खेळ कुस्ती व ढोल लेझीम इथे गावोगावच्या उरुसामध्ये ग्राम दैवताच्या साक्षीने खेळले जातात. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड व मुंबईसारख्या शहरांमध्ये ही मावळातील ढोल लेझीमचा सुर गर्जत असतो. तर कुठे सर्जा राजाची जोमात वाढविलेली बैल जोडी धुरळा उडवत नंबरात येत असते. जगद्गुरु तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अभंग व कीर्तनाने गाव गावातील मंदिरे दुमदुमून जातात. लहानग्यांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वजण हरिनामाचे टाळ वाजवून ईश्वर भक्तीत रंगून जातात. 

            
               मावळ तालूक्यात पूर्वी काही प्रमुख ठिकाणे शिक्षणाची केंद्रे होती. तळेगाव दाभाडे, वडगाव-मावळ, कामशेत, लोणावळा, पवनानगर, चांदखेड, टाकवे बु. अशा प्रमुख ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी केंद्रीभूत झालेल्या शिक्षणाच्या पाऊलवाटा आता मोठे मार्ग बनून मावळातील सर्वदूर अशा टोकाच्या दुर्गम भागात व कड्या कपारी पर्यंत पोहोचलेल्या आहेत. या प्रगतीच्या पथावर मार्गक्रमण करत असताना मावळातील शैक्षणिक स्मार्ट विजन म्हणजेच स्मार्ट मावळ डोळ्यासमोर ठेवून पुढील काही निवडक गोष्टी शिक्षणाला नवसंजीवनी देत आहेत. 

            मावळ तालुका शैक्षणिक बाबतीत केवळ प्राथमिक व माध्यमिक शिक्षणापुरता मर्यादित न राहता अनेक अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतन संस्था , व्यवसाय विकास संस्था , औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा अनेक बाबतीत सुसज्ज बनलेला आहे. अनेक नामांकित व नवनवीन शैक्षणिक संस्था व संकुल मावळ मधील उपलब्ध अनुकूल परिस्थितीचा वापर अत्याधुनिक शिक्षणासाठी करत आहेत. त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या मावळ ‘ शैक्षणिक हब ’ बनत चाललेला आहे. शाळांना अत्याधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध होत आहेत. अनेक शाळांना व अंगणवाड्यांना गरजेनुसार वर्गखोल्या, त्याचबरोबर शाळेच्या सुरक्षा भिंती, बोलक्या भिंती, सुसज्ज क्रीडांगणे मुला-मुलींची स्वच्छतागृहे पिण्याच्या पाण्याची सोय तसेच बांधकाम दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊन त्या सुसज्ज झालेल्या आहेत. तसेच ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ, व्यवस्थापन समिती, स्वयंसेवी संस्था, खाजगी कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध दानशूरांच्या सहभागातून मदत झालेली आहे. शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी व आनंदी उत्साहवर्धक शिक्षणासाठी पावले उचलली जात आहेत. 

            संगणक शिक्षण व ई लर्निंग सुविधा बाबतीत आधुनिक काळाची पावले ओळखून अध्ययन अध्यापन प्रक्रिया आता पारंपरिक न राहता ती आधुनिक झालेली आहे. तंत्रज्ञानाने साधलेली प्रगती आता शिक्षण क्षेत्रातही वाढत चाललेली आहे . तालुक्यातील अनेक शाळा या संगणकीकृत झाल्या असून ई-लर्निंग व संगणक प्रयोगशाळा युक्त झाल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन शिक्षणात अनेक तंत्रस्नेही शिक्षकांनी आपल्या कौशल्याचा वापर करून गुगल मीट , झूम, गुगल क्लासरूम, युट्युब, पीडीएफ व विविध अप्लिकेशनचा वापर करून शिक्षणात वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. स्वनिर्मित व्हिडीओ निर्माण करून शिक्षणात चैतन्य आणले आहे. शिक्षणातील नवनवीन प्रवाहानुसार पाठ्यक्रम आणि आता संगणकाचा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रवेश घेतलेला असल्याने अध्ययन-अध्यापन प्रवाही व वेगवान झाले आहे पाठ्यपुस्तकातील कविता, पाढे, गाणी, विज्ञानातील प्रयोगाच्या शैक्षणिक अनुभूती आता ई-लर्निंगच्या माध्यमातून अनेक शाळांतून चालू आहे. नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणही आता ऑनलाइन झालेले आहे. भविष्यात लवकरच डिजिटल क्लासरूम ही संकल्पना मावळमधील अनेक शाळांमधून सुरु करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. 

          

 
कला क्रीडा व संगीत मावळ तालुक्याला पूर्वीपासूनच कलेचा वारसा लाभलेला आहे. इथली लाल माती ही अनेक मराठी मातीतील खेळाने सजलेली आहे. कबड्डी खो-खो कुस्ती ढोल लेझीम नृत्य कला संगीत समूहगीत अशा अनेक प्रकारांनी शाळांमध्ये सांस्कृतिक बांधिलकी जपली आहे. कला क्रीडा स्पर्धांतून शाळेतील विद्यार्थ्यांच्या नवीन चैतन्याला व सुप्त गुणांना अनोखा बहरच आलेला असतो. तालुका, जिल्हा, राज्य अशा अनेक पातळ्यांवर हे विद्यार्थी चमकतात यासाठी सर्व शिक्षक वर्ग दिवस-रात्र मेहनत घेत असतो. जवळच असलेल्या पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातूनही या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होत असते. अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण व पुढील स्तरावरील योग्य मार्गदर्शनाची योग्य संधी दिली जात आहे. अनेक लेखन करणारे शिक्षक व विद्यार्थी तालुक्यात लाभलेल्या असून शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी तालुकास्तरावर कवी संमेलन व साहित्य संमेलन तसेच व्याख्याने संपन्न होत आहे यातून लेखनाचा वारसा समृद्ध होत आहे. 

            तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी एमपीएससी व यूपीएससी परीक्षांमध्ये यश प्राप्त करून प्रशासनात विविध विभागात अधिकारी पदावर ते कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षा तयारी, शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परीक्षा, त्याचबरोबर नवोदय विद्यालय परीक्षा, राष्ट्रीय गुणवत्ता शोध परीक्षा अशा गुणवत्तेवर आधारित स्पर्धा परीक्षांना पूरक अशा परीक्षा अनेक शाळांमधून घेतल्या जात असून त्यांना मार्गदर्शन मिळत आहे. यामधूनच अनेक विद्यार्थी तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश मिळवत आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून तालुका विभाग स्तरावरती विशेष मार्गदर्शन व कार्यशाळांचे नियोजन केले जाते. या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योग्य लक्ष गाठता येईल व भविष्यात स्पर्धा परीक्षांच्या आव्हानांना सामोरे जाता येईल अशा पद्धतीने तयारी चालू आहे. शिक्षणातील नवीन प्रवाह व आव्हाने शासन व शिक्षण विभागाकडून काही सुधारित बदल व नवीन उपक्रम येत आहेत. त्याला सामोरे जाण्यासाठी शिक्षकांनी प्रशिक्षण व अतिरिक्त शिक्षण घेऊन स्वत:मध्ये अनेक नवीन बदल घडवून आणले आहेत. अनेक नवोपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अनुभव दिले जात आहेत. पुणे आणि मुंबईच्या मार्गावर हा तालुका असल्याने अनेक नवीन शैक्षणिक प्रयोगांची प्रयोगशाळाच हा तालुका बनलेला आहे. त्यामुळे योग्य शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात पिंपरी चिंचवड, पुणे, हिंजवडी आय टी पार्क, तळेगाव व चाकण एम आय डी सी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. भविष्यातील अनेक धोरणे लक्षात घेता विकासाची आधुनिक गंगा ही इंद्रायणी व पवनेच्या पाण्याप्रमाणे मावळच्या प्रत्येक भागात पोहोचली असून ती मावळ माती बरोबरच विचारांची सुपिकताही वाढवत आहे. तुकोबारायांची गाथा व ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील श्लोक व अभंगाबरोबरच स्वतंत्र व आधुनिक शिक्षणाचे विचार मनामनात पेरले जात आहेत. त्यामुळे इंद्रायणी व आंबेमोहोर तांदुळाबरोबरच ज्ञानाचा सुगंधही सर्व ठिकाणी दूरवर पसरत आहे. 




            स्मार्ट शैक्षणिक मावळ स्वप्न साकार होण्यामध्ये हजारो हातांनी प्रयत्न होत आहेत आणि या सर्व प्रयत्नास "सकाळ" सारख्या वास्तव चित्रण मांडणाऱ्या व सामाजिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या वृत्तपत्राची साथ लाभत आहे. त्या सर्व टीमचे मनः पूर्वक धन्यवाद.....! 

"मनामनात जपू या ही माणुसकीची नाती 
आपली संस्कृती अभिमान हीच मावळ माती" 

लेखन - संजय वसंत जगताप शाळा 
टाकवे खुर्द मावळ ८६६८६५४५४६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या